कमी पावसामुळे या वर्षी आपल्याला सर्वत्र जनावराच्या चाऱ्याची कमतरता पाहायला मिळत आहे ,या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाय शोधले जात आहेत, मूरघास , सोयाबीन पिकाचा भूसा हा आत्ता पासूनच साठवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. पण तरी ही उन्हाळ्यात चाऱ्याच्या उपलब्धते बाबत साशंकता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
या वर हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून मात करता येईल, कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी वेळेत हिरवा पौष्टिक आणि लुसलुशीत चारा जनावरांना उपलब्ध करता येऊ शकतो
हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स एक प्रकारची पीक पद्धती या मध्ये पाण्यामध्ये पिकाची वाढ ही पाण्याच्या मध्यामातून केली जाते , मातीची या मध्ये गरज नसते. पॉली हाऊस किंवा शेड नेट मध्ये याचे उत्पादन हे घेता येते प्लास्टिक ट्रे हे लोखंडी रॅक,pvc पाइप किंवा बांबू च्या रॅक वर ठेवून स्प्रे पंप किंवा स्वयंचलित फॉगर च्या पाण्याचे फवाऱ्याच्या साहाय्याने पाणी देऊन यातील पिकाची वाढ केली जाते.
हायड्रोपोनिक्स चारा तयार कसा करावा?
मका, बाजरी, गहू, बार्ली या तृण धान्याची चारा म्हणून निर्मिती करता येते, ज्वारी ही हायड्रोपोनिक्स मध्ये घेऊ नये असे सांगितले जाते,कारण कोवळ्या ज्वारीच्या ताटामध्ये हायड्रोसायनिक अँसिड असते, या अँसिडमुळे जनावरांमध्ये विषबाधा होऊ शकते,
कोणते बियाणे निवडावे - उत्तम प्रतीचे, टपोरे दाणेदार व 80% पेक्षा अधिक उगवण क्षमता असलेले रोगमुक्त बुरशी मुक्त बियाणे निवडावे. यावर कुठली ही बीज प्रक्रिया केलेली नसावी . कारण यातून जनावरांना विषबाधा होऊ शकते.
प्रथमतः बियाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कोमट पाण्यात मोड येण्यासाठी 12 ते 24 तासासाठी भिजत ठेवावे,त्यानंतर बियाणे काढून गोणपाटा मध्ये गुंडाळून ठेवावे, यामुळे मोड येण्यास मदत होते. सकाळ संध्याकाळ त्यावर मीठ शिंपडावे जेणेकरून बुरशी जन्य रोगापासून संरक्षण मिळेल.
ट्रे चांगले धुवून वाळून घ्यावेत चांगले, त्यानंतर मोड आलेले धान्य प्रति ट्रे एक किलो या प्रमाणात टाकून ट्रे शेड मध्ये रॅक वर ठेवावेत. शेड मध्ये कायम ओलावा आणि आद्रता राहावी या साठी फॉगर्स चा वापर करावा, प्रति ट्रे ला 2 पेक्षा जास्त पाणी लागत नाही . 15 दिवसात पूर्ण जर चारा तयार होतो असा विचार केला आणि या नुसार पाहिले तर एका ट्रे ला सगळे मिळून 30 लिटर पाणी लागते.
अश्या पद्धतीने 12-15 दिवसात 25-30 सें. मी. उंचीचा चारा तयार होतो, 1 किलो बियाणे वापरून 10-12 किलो हिरवा चारा तयार करता येतो.
हा चारा कसा द्यावा?
हा हिरवा चारा आणि लुसलुशीत असल्याने हा चारा जनावरे आवडीने खातात, हा चारा थेट ट्रे मधून काढून देता येतो पण फक्त हाच चारा खाल्ल्यामुळे अपचन पोट फुगणे अश्या समस्या होऊ शकतात ,या मुळे हा चारा सुक्या चाऱ्या सोबत मिसळून द्यायला हवा.
हायड्रोपोनिक्स चे फायदे
जेंव्हा शेतात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते त्या काळात हा उत्तम पर्याय ठरतो
कमी जागा ,कमी पाणी आणि कमी वेळात हा चारा बनवला जाऊ शकतो
मुळासकट हा चारा खाता येत असल्यामुळे जास्तीत जास्त अन्न घटक यातून मिळतात, पाणी,जीवनसत्वे आणि पौष्टिक अन्न घटक यातून मोठ्या प्रमाणावर मिळतात
जीवनसत्वे,प्रथिने आणि सूक्ष्म अन्न घटकाचे प्रमाण या मध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांना मिळते.
या तंत्राचा वापर करून पूर्ण वर्ष भर हिरवा चारा मिळवला जाऊ शकतो
या तंत्राचा वापर करून जवळपास 25 ते 30% पर्यंत चाऱ्यासाठी लागणारा खर्च कमी करता येऊ शकतो.
दुभत्या जनावराच्या फॅट मध्ये वाढ होते.
साठवलेल्या चाऱ्याप्रमाने या मध्ये कुठली नासधूस होत नाही व अन्नघटक ही वाया जात नाहीत.